न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि.२९ मे २०२६) :- पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थविरोधी पथकाने चाकण आणि थेरगाव परिसरात कारवाई करत १५ लाख रुपयांहून अधिक किमतीचा गांजा जप्त केला आहे. या प्रकरणात चौघांना अटक करण्यात आली आहे.
पहिल्या कारवाईत चाकण-दक्षिण पोलीस ठाण्याच्या हद्दीत शिक्रापूर-चाकण महामार्गालगत मोहितेवाडी येथे तीन आरोपींना ताब्यात घेण्यात आले. संदीप हांडे, गणेश तारु आणि रिहान शेख अशी अटक आरोपींची नावे आहेत. त्यांच्या ताब्यातून १२ लाख १० हजार ५०० रुपये किमतीचा २३ किलो ५३८ ग्रॅम गांजा, मोबाईल फोन आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली.
दुसऱ्या कारवाईत काळेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत थेरगाव स्मशानभूमीजवळ अशोक आडवाणी याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून ३ लाख ३० हजार ७५० रुपये किमतीचा ३ किलो ९१५ ग्रॅम गांजा, मोबाईल आणि दुचाकी जप्त करण्यात आली. दोन्ही प्रकरणांचा पुढील तपास पोलीस करत आहेत.















