- विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांचा तीव्र निषेध;
- मृतांच्या कुटुंबीयांना मदतीची ग्वाही…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि.२९ मे २०२६) :- पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरातील हडपसर, दापोडी आणि फुगेवाडी येथे विषारी दारू सेवनामुळे १७ निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी, धक्कादायक आणि वेदनादायी असल्याची भावना पिंपरी-चिंचवड महापालिकेचे विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांनी व्यक्त केली. या घटनेचा त्यांनी तीव्र निषेध करत मृतांच्या कुटुंबीयांप्रती सखोल संवेदना व्यक्त केल्या.
या प्रकरणातील मुख्य संशयितास अटक झाली असली तरी नागरिकांच्या मृत्यूस जबाबदार असलेल्या सर्व दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी भोईर यांनी केली. त्यांनी पीडित कुटुंबीयांची प्रत्यक्ष भेट घेऊन सांत्वन केले व आवश्यक ती मदत करण्याची ग्वाही दिली.
शहरातील अवैध दारू व्यवसाय, अमली पदार्थांची तस्करी आणि इतर बेकायदेशीर धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी प्रशासनाने कठोर मोहीम राबवावी, अशी मागणीही त्यांनी केली.















