- संशयास्पद मृत्यूंच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या मारुती जाधवांची पोलिसांकडे मागणी…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि.२९ मे २०२६) :- पिंपरी चिंचवड शहरातील दापोडी आणि फुगेवाडी परिसरात गुरुवार (दि. 28 मे) रोजी एकाच दिवशी आठ नागरिकांचा झालेला संशयास्पद मृत्यू अत्यंत धक्कादायक, गंभीर आणि वेदनादायी असल्याची प्रतिक्रिया व्यक्त करत प्रभाग क्रमांक 11 मधील कृष्णानगर परिसरात सुरू असलेल्या अवैध बार व वाईन शॉपवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सामाजिक कार्यकर्ते मारुती गणपत जाधव यांनी पोलीस प्रशासनाला निवेदन देत कृष्णानगर, अजंठा नगर घरकुल, भीमशक्ती नगर, महात्मा फुले नगर आणि हरगुडे वस्ती परिसरात काही ठिकाणी रात्री उशिरापर्यंत अवैध व्यवसाय सुरू असल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे महिला, ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
निवेदनात काही ठिकाणी संशयास्पद हालचाली वाढल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. संबंधित अवैध व्यवसायांवर तातडीने छापेमार कारवाई करून ते बंद करण्यात यावेत तसेच संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी जाधव यांनी केली आहे.
कृष्णानगर चौकातील भिशे वाईन शॉपमुळे परिसरातील महिलांना अनेक वर्षांपासून त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोपही त्यांनी केला. या ठिकाणी वारंवार मोठ्या आवाजात शिवीगाळ, भांडणे आणि मारामाऱ्या होत असून यापूर्वी गंभीर गुन्हे देखील घडल्याचे त्यांनी नमूद केले. त्यामुळे संबंधित वाईन शॉपवर तात्काळ कारवाई करून ते अन्यत्र हलवावे, अन्यथा नागरिकांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा मारुती जाधव यांनी दिला आहे.















