- ‘आप’चा पोलीस प्रशासनावर गंभीर आरोप…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि.२९ मे २०२६) :- पिंपरी-चिंचवड शहरात खुलेआम सुरू असलेल्या अवैध हातभट्टी दारू विक्रीकडे पोलीस प्रशासनाने केलेल्या दुर्लक्षामुळेच १५ निष्पाप नागरिकांचा बळी गेल्याचा गंभीर आरोप आम आदमी पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. या प्रकरणी जबाबदार पोलीस अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणीही पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे.
आम आदमी पार्टीच्या शिष्टमंडळाने यापूर्वीच पोलीस आयुक्तांना लेखी निवेदन देत शहरातील विविध भागांत सुरू असलेल्या अवैध हातभट्टी दारू विक्रीबाबत इशारा दिला होता. या अवैध धंद्यांमुळे नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाला असून मोठी दुर्घटना घडू शकते, असे निवेदनात नमूद करण्यात आले होते. मात्र, पोलीस प्रशासनाने या इशाऱ्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप ‘आप’ने केला आहे.
“जर वेळीच कठोर कारवाई करण्यात आली असती, तर आज १५ नागरिकांना जीव गमवावा लागला नसता. या मृत्यूंना पोलीस प्रशासनाचा ढिसाळ कारभार आणि निष्क्रियता जबाबदार आहे,” असा आरोप पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केला.
या घटनेनंतर आम आदमी पार्टीने काही प्रमुख मागण्या प्रशासनाकडे केल्या आहेत. अवैध दारू विक्रीस अभय देणाऱ्या संबंधित पोलीस अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, शहरातील सर्व अवैध हातभट्टी दारूचे अड्डे कायमस्वरूपी उद्ध्वस्त करावेत तसेच मृतांच्या कुटुंबीयांना शासनाकडून आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, या प्रकरणात दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई न झाल्यास संपूर्ण शहरात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही आम आदमी पार्टीच्या वतीने देण्यात आला आहे.















