- काही कुटुंबांवर दबाव?..
- प्रशासनाकडून मृतांची खरी संख्या बाहेर येईना?…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २९ मे २०२६) :-दापोडी परिसरात विषारी दारू प्रकरणात झालेल्या मृत्यूंची खरी संख्या दडपण्याचा प्रयत्न सत्ताधारी पक्ष आणि प्रशासनाकडून केला जात असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे यांनी केला आहे. संबंधित प्रकरणाची निष्पक्ष आणि सखोल चौकशी व्हावी, तसेच दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी दापोडी येथील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची भेट घेऊन केली.
गव्हाणे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, विषारी दारूमुळे अनेक निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला असून या घटनेमुळे परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, प्रशासनाकडून मृतांची खरी संख्या जाहीर केली जात नसल्याचा आरोप त्यांनी केला. काही कुटुंबांवर दबाव टाकून या प्रकरणाबाबत वाच्यता करू नये, अशी सक्ती केली जात असल्याचाही दावा त्यांनी केला.
“सत्ताधारी पक्षाच्या पाठबळाशिवाय असा अवैध व्यवसाय चालू शकत नाही. अनेक ठिकाणी अवैध दारू विक्री सुरू असल्याची माहिती स्थानिक प्रशासनाला असूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे आज ही गंभीर घटना घडली आहे,” असे गव्हाणे म्हणाले. संबंधित अधिकाऱ्यांवरही जबाबदारी निश्चित करून चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली.
यावेळी त्यांनी पोलिस प्रशासनाने या प्रकरणात पारदर्शक भूमिका घेणे आवश्यक असल्याचे सांगितले. मृतांच्या नातेवाईकांना न्याय मिळावा, दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा आणि या संपूर्ण रॅकेटमागील मुख्य सूत्रधारांना अटक करावी, अशी मागणीही त्यांनी केली.
दरम्यान, या घटनेमुळे दापोडी आणि परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. अवैध दारू विक्रीविरोधात कठोर मोहीम राबवावी, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू असल्याची माहिती मिळत असून अधिकृत आकडेवारी आणि अहवालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.















