- प्राधिकरणात रंगला हास्य आणि संस्कारांचा अनोखा मेळा…
- अनुप मोरे सोशल अँड स्पोर्ट्स फाउंडेशन आणि रंगरेज एंटरटेन्मेंटचा पुढाकार…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
प्राधिकरण (दि.२९ मे २०२६) :- अनुप मोरे सोशल अँड स्पोर्ट्स फाउंडेशन आणि रंगरेज एंटरटेन्मेंट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ‘बोक्या सातबंडे’ या संस्कारक्षम बालनाट्याला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ग.दि. माडगूळकर नाट्यगृह, प्राधिकरण, निगडी येथे पार पडलेल्या या विशेष प्रयोगाने लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांचेच मनोरंजन केले.
कार्यक्रमाचे उद्घाटन भाजयुमोचे माजी प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे, माजी उपमहापौर सौ. शैलजा अविनाश मोरे, माजी महापौर आर एस कुमार, फाउंडेशनचे खजिनदार सलीम शिकलगार,
फाउंडेशनचे सह खजिनदार मनोज देशमुख आदींच्या उपस्थित करण्यात आले.
प्रसिद्ध अभिनेते आणि लेखक दिलीप प्रभावळकर यांच्या कथेवर आधारित असलेल्या या बालनाट्यात हास्य, साहस, कौटुंबिक नातेसंबंध आणि संस्कार यांचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला. आजी आणि नातवामधील प्रेमळ नाते, मुलांच्या खोडकर स्वभावातून निर्माण होणारे प्रसंग आणि त्यातून मिळणारे संस्कार यामुळे नाटकाला विशेष रंगत आली. कलाकारांच्या दमदार अभिनयाला आणि संवादफेकीला उपस्थित प्रेक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली.
कार्यक्रमासाठी माजी उपमहापौर तथा नगरसेविका सौ. शैलजा अविनाश मोरे आणि भाजयुमो महाराष्ट्र माजी प्रदेशाध्यक्ष अनुप शैलजा अविनाश मोरे यांनी विशेष पुढाकार घेतला होता.
सौ. शैलजा अविनाश मोरे यांनी मुलांमध्ये संस्कार, कुटुंबातील नातेसंबंध आणि सामाजिक मूल्यांची जपणूक व्हावी या उद्देशाने अशा सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन महत्त्वाचे असल्याचे सांगितले. समाजात सकारात्मक वातावरण निर्माण करण्यासाठी कला आणि संस्कृती प्रभावी माध्यम ठरते. सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून मुलांमध्ये संस्कारमूल्ये रुजवण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
भाजयुमोचे माजी प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे म्हणाले, मोठ्या संख्येने बालचमुंनी कार्यक्रमास उपस्थिती लावली. अनेक मुलं ही मोबाईलमध्ये अडकलेली आहेत. चांगलं-वाईटाची जाणीव तसेच सांस्कृतिक आणि कौटुंबिक मूल्य त्यांना समजावेत यासाठी असे उपक्रम भविष्यातही आयोजित करण्यात येणार असल्याचे अनुप मोरे यांनी सांगीतले.















