न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ जून २०१९) :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या बांधकाम परवानगी विभागाने मौजे रावेत येथील मे. पोलाईट बिल्टेक या बांधकाम प्रकल्पास पैसे खाऊन दिलेल्या चुकीच्या परवानगीला स्थगिती देऊन, या प्रकरणाची चौकशी करुन, दोषींवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी आयुक्त हर्डीकर यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
या पत्रात त्यांनी म्हटले आहे की, मौजे रावेत सर्वे नं १३३ मध्ये श्री विशाल बाळकृष्ण भोंडवे मु. पो. रावेत ता. हवेली जि. पुणे यांचे परिवारातील शिवचरण बाळकृष्ण भोंडवे, विशाल बाळकृष्ण भोंडवे सामाईक क्षेत्र ६९.००, आर इतके वडीलोपार्जीत ताबेवहीवाटीची क्षेत्र आहे. मे. पोलाईट बिल्टेक या बांधकाम व्यवसायीक श्री दिनेशभाई पटेल यांनी व आर्किटेक्ट श्री महेंद्र ठाकुर यांनी मौजे रावेत, यांनी सर्वे नं. १३३ मध्ये श्री विशाल बाळकृष्ण भोंडवे यांच्या मालकीच्या जागेवर रस्ता झालेला नसताना चुकीच्या माहीतीच्या आधारे बांधकाम परवानगीसाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकडे प्लान टाकला. शिवचरण बाळकृष्ण भोंडवे, विशाल बाळकृष्ण भोंडवे या दोघांना कुठलीही माहिती होऊ न देता, त्यांची एनओसी न घेता. संबंधित मे. पोलाईट बिल्टेक बांधकाम व्यवसायीकांनी परवानगी मिळविली आहे.
सदर प्लॉटमध्ये मे. पोलाईट बिल्टेक यांचे आठ मजली बिल्डींगचे काम सुरु आहे. या इमारतीच्या पुर्वेला सहा मीटरचा ऍप्रोच रस्ता आहे. मात्र दक्षिणेस डीपीमधील अठरा मीटरचा रस्ता असून, त्या रस्त्याच्या जागेबाबत मनपा ने कुठलेही भुसंपादक अथवा कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. मुळ जागा मालक श्री विशाल बाळकृष्ण भोंडवे यांना या जागेचा कुठलाही मोबदला दिलेला नाही. संबंधित बिल्डर पटेल, आर्किटेक्ट ठाकुर यांनी भूमी अभिलेख हवेली यांना मॅनेज करुन मोजणीत संबंधित बिल्डरने स्वत:ची वहीवाट दाखवली. प्रत्यक्षात अठरा मीटरचा रस्ता झालेला नसताना श्री ठाकुर व पटेल यांचा बांधकाम प्लॉन महानगरपालिकेच्या बांधकाम परवानगी विभागाने मंजूर केला. यामध्ये या रस्त्याच्या जागेचा टीडीआर वापरला असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
श्री विशाल बाळकृष्ण भोंडवे मु. पो. रावेत ता. हवेली जि. पुणे यांनी याबाबत आपल्याला नगररचना विभाग, बांधकाम परवानगी विभाग व मा.मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य नगरविकास खाते यांना लिखीत स्वरुपात वेळोवेळी तक्रार केल्या आहे. तसेच महाराष्ट्र स्थावर नियमाक महामंडळ (रे.रा.) यांना प्रत्यक्ष भेटून तक्रार निवेदन दिले आहे. मात्र या प्रकरणाची कोणीही दखल घेतली नाही. या प्रकरणाबाबत खुलासा मागीतला आहे ऐवढेच सांगीतले जाते. परवानगी देताना विभागाच्या अधिका-यांनी कुठल्या प्रकारे स्थळपहाणी केलेली नसून, सत्यता न पडळताय बांधकाम परवानगी विभागाने परवानगी दिली आहे.
मु.पो. रावेत ता. हवेली जि. पुणे मौजे रावेत सर्वे नं १३३ येथील जागेवर ताबा श्री विशाल बाळकृष्ण भोंडवे यांच्या मालकीची असताना स्थळ पाहणी न करता त्यांची एनओसी न घेता ही बांधकाम परवानगी दिली कशी? तसेच या प्रकरणात टीडीआरचा वापर कसा झाला? याची चौकशी व्हावी. तसेच मौजे रावेत येथील मे.पोलाईट बिल्टेक बांधकाम परवानगी विभागाने पैसे खाऊन दिलेली चुकीच्या परवानगीला स्थगिती देऊन या प्रकरणाची चौकशी करुन यातील सर्व दोषींवर योग्य ती कारवाई करावी. सदर बांधकामात भविष्यात ग्राहकांची होणारी फसवणूक टाळावी, असे या पत्रात भापकर यांनी म्हटले आहे.















