- १ लाख वृक्षारोपणासह विविध अभियानांची रणनीती निश्चित..
- पिंपरी-चिंचवडमध्ये संघटनात्मक कामाला वेग…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड | दि. ३ जून २०२६ :- भारतीय जनता पार्टीच्या पश्चिम महाराष्ट्र विभागाच्या वतीने पिंपरी-चिंचवड येथे विभागीय आढावा बैठक उत्साहात पार पडली. या बैठकीत आगामी संघटनात्मक उपक्रम, पर्यावरण दिन, योग दिन, आणीबाणीच्या ५१ व्या वर्षानिमित्त कार्यक्रम तसेच मोदी सरकारच्या योजनांचा प्रचार याबाबत रणनीती निश्चित करण्यात आली.
बैठकीला भाजप महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस व विभाग समन्वयक आमदार निरंजन डावखरे, प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर, विक्रम देशमुख, विक्रम पाचपुते, जिल्हा प्रभारी भरत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे यांनी स्वागत केले.
बैठकीत ५ जून रोजी पर्यावरण दिनानिमित्त शहरात १५ हजार झाडे लावण्याचे आणि संपूर्ण सप्ताहात १ लाख वृक्षारोपण करण्याचे उद्दिष्ट जाहीर करण्यात आले. तसेच २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या प्रमाणावर साजरा करण्याचे नियोजन करण्यात आले.
याशिवाय २५ जून रोजी आणीबाणीच्या काळातील ‘मिसाबंदी’ कार्यकर्त्यांचा सत्कार आणि व्याख्यानांचे आयोजन होणार आहे. केंद्र सरकारच्या योजनांबाबत जनजागृतीसाठी प्रदर्शन, चित्रकला स्पर्धा आणि लाभार्थ्यांच्या प्रतिक्रिया मोहिमाही राबविण्यात येणार आहे.
बैठकीत ‘SIR’ संघटन नोंदणी अभियानाचाही आढावा घेण्यात आला. पिंपरी-चिंचवडमध्ये आतापर्यंत ४० टक्के नोंदणी पूर्ण झाल्याची माहिती शहराध्यक्ष बापू काटे यांनी दिली.















