- केंद्राकडून २५ टक्के निधी, उर्वरित रक्कम बॉण्डद्वारे उभारणार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. ४ जून २०२६) :- गेल्या १५ वर्षांपासून रखडलेल्या पवना बंद जलवाहिनी प्रकल्पाला आता गती मिळण्याची चिन्हे आहेत. केंद्र शासनाच्या अर्बन चॅलेंज फंडातून या प्रकल्पासाठी २५ टक्के निधी उपलब्ध होणार असून उर्वरित ७५ टक्के निधी महापालिका स्वतः उभारणार आहे. यासाठी म्युनिसिपल बॉण्ड, वित्तीय संस्था आणि राष्ट्रीयीकृत बँकांकडून कर्ज घेण्याच्या पर्यायांवर प्रशासन विचार करत आहे.
अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे यांनी सांगितले की, पवना बंद जलवाहिनी प्रकल्पामुळे शहराला स्वच्छ व प्रदूषणमुक्त पाणी मिळणार आहे. त्यामुळे पाणी शुद्धीकरण प्रक्रियेवरील खर्चात मोठी बचत होणार आहे. तसेच भामा-आसखेड पाणी योजनेतून १६७ एमएलडी पाणीही बंद जलवाहिनीद्वारे उपलब्ध होणार असल्याने शहराच्या पाणीपुरवठ्याला मोठा दिलासा मिळेल.
मुळा नदी सुधार प्रकल्पासाठी २०० कोटींचे म्युनिसिपल बॉण्ड आणि हरितसेतू प्रकल्पासाठी २०० कोटींचे ग्रीन बॉण्ड यशस्वीपणे उभारल्यानंतर आता पवना जलवाहिनीसाठी तिसऱ्यांदा बॉण्डद्वारे निधी उभारण्याची तयारी सुरू आहे. केंद्राच्या निधी मंजुरीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून त्यानंतर निविदा काढून प्रत्यक्ष काम सुरू करण्यात येणार आहे.















