न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. ४ जून २०२६) :- फुगेवाडी येथील विषारी दारू प्रकरणात संबंधित पोलिस व राज्य उत्पादन शुल्क (एक्साइज) विभागाच्या अधिकाऱ्यांना केवळ निलंबित करून चालणार नाही, तर त्यांना या गुन्ह्यात सहआरोपी करण्यात यावे, अशी मागणी उद्धवसेनेचे नेते तथा विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली.
या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर दानवे, उपनेते सचिन अहिर व आमदार सुनील शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयात जाऊन अपर पोलिस आयुक्त सारंग आवाड यांना निवेदन दिले. यावेळी माजी आमदार अॅड. गौतम चाबुकस्वार, शहरप्रमुख चेतन पवार, रोमी संधू, तुषार नवले, कैलास नेवासकर, अनिता तुतारे आदी उपस्थित होते.
“दारूअड्डे कुठे आणि कोणाचे आहेत, याची माहिती पोलिसांना असते. त्यामुळे केवळ निलंबन नको, तर संबंधित अधिकाऱ्यांवरही गुन्हा दाखल करावा,” अशी भूमिका दानवे यांनी मांडली.















