न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चाकण (दि. ४ जून २०२६) :- पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने चाकण येथील अवैध गॅस रिफिलिंग व्यवसायावर धाड टाकून ९ लाख ७१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत २५१ गॅस सिलेंडर, गॅस रिफिलिंगसाठी वापरण्यात येणारे साहित्य आणि एक बोलेरो टेम्पो जप्त करण्यात आला आहे.
गोपनीय माहितीच्या आधारे चाकण मार्केट यार्डजवळील बालाजी गॅस एजन्सी परिसरात छापा टाकण्यात आला. यावेळी भरलेल्या गॅस सिलेंडरमधून लहान सिलेंडरमध्ये बेकायदेशीररीत्या गॅस भरला जात असल्याचे उघड झाले. पोलिसांनी प्रकाश जवळागी (वय ३२) आणि तुषार वारुळे (वय ३६) यांना ताब्यात घेतले असून एजन्सी मालक शुभम प्रवीण परदेशी हा फरार आहे.
आरोपी कोणतीही सुरक्षा उपाययोजना न करता ज्वालाग्राही गॅसचे रिफिलिंग करून नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण करत असल्याचे तपासात समोर आले आहे. याप्रकरणी चाकण उत्तर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास मालमत्ता गुन्हे विरोधी पथक करत आहे.















