न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. ४ जून २०२६) :- सार्वजनिक ठिकाणी अश्लील हावभाव करून नागरिकांना त्रास देणे तसेच अनैतिक व्यवसायासाठी ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी दिघी आणि बावधन पोलिसांनी स्वतंत्र कारवाया करत पाच महिलांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. संबंधित महिलांना नोटीस बजावण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
दिघी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील आळंदी-चाकण रोडवरील योगीराज चौक परिसरात ३ जून रोजी सायंकाळी कारवाई करण्यात आली. पोलिस कर्मचारी कृष्णा कराड आणि सुभाष पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, एका महिलेने सार्वजनिक ठिकाणी अश्लील हावभाव आणि शब्दांचा वापर करून जाणाऱ्या-येणाऱ्या नागरिकांना अडथळा निर्माण केला तसेच सार्वजनिक सभ्यतेचा भंग होईल असे कृत्य केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी संबंधित महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस उपनिरीक्षक भोईर करत आहेत.
दरम्यान, गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने बावधन परिसरात विशेष मोहीम राबवून दोन स्वतंत्र कारवाया केल्या. बावधन-मुंबई-बेंगळुरू महामार्गावरील ग्रीन पार्क लॉज आणि समीर ऑटो गॅरेज परिसरात दोन महिलांविरुद्ध अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले. या महिलांनी वेश्याव्यवसायाच्या उद्देशाने सार्वजनिक ठिकाणी लैंगिक हावभाव करून नागरिकांना अडथळा निर्माण केल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.
याशिवाय भुगाव रोडवरील अॅब्रोसिया हॉटेल परिसरातही अशाच प्रकारे वर्तन करणाऱ्या एका महिलेविरुद्ध बावधन पोलिसांनी कारवाई केली. सर्व प्रकरणांमध्ये संबंधित महिलांना नोटीस देण्यात आली असून कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.
सार्वजनिक शिष्टाचार आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अशा कारवाया पुढेही सुरू राहतील, असा इशारा पोलिसांकडून देण्यात आला आहे.















