न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ जून २०१९) :- वाकड येथील कस्पटे वस्तीतील निसर्ग पूजा सोसायटीच्या संरक्षक भिंतीशेजारी महापालिकेची ड्रेनेज लाईन आहे. त्याच्या शेजारून नाला गेला आहे. पावसाळ्यात नाल्याचे पाणी घरात शिरू नये म्हणून संरक्षक भिंतीला सांडपाणी जाण्यासाठी आउटलेट काढून दिले आहे. मात्र, ड्रेनेज लाईन फुटल्याने सांडपाणी सोसायटीमध्ये येत आहे. याबाबत तक्रार करुनही महापालिकेने कार्यवाही न केल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
संरक्षक भिंती शेजारील ड्रेनेज लाईन अज्ञातांनी फोडल्याने कस्पटेवस्तीचे सांडपाणी निसर्ग पूजा सोसायटीत येत आहे. सांडपाण्याचा आणि घाणीचा निचरा होण्यासाठी स्टॉर्म वॉटर अभियंत्यांना एअर प्रेशर मशीन उपलब्ध करून देण्याची मागणी नागरिकांनी केली.
मात्र, मशीनच उपलब्ध नसल्याचे अधिका-यांनी सांगितले. नागरिकांनी ठेकेदाराला विनवणी करून सांडपाण्याचा निचरा करून घेतला. अद्यापही या ठिकाणी बराच राडा रोडा शिल्लक आहे. सांडपाण्यामुळे सोसायटीमधील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. प्रशासनाने किमान संवेदनशीलता दाखवावी, असे सोसायटीचे सचिव ए. एम. देशमुख यांनी सांगितले.















