- ‘सर्व्हर’ डाऊन’ मुळे पक्षकारांना त्रास तर, वकिलांना मनस्ताप
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ जून २०१९) :- पिंपरी चिंचवड व जिल्ह्यातील खरेदी-विक्रीसह विविध दस्त नोंदणीसाठी दुय्यम निबंधक कार्यालयात गेलेल्या नागरिकांना सर्व्हरच्या संथगतीचा मोठा फटका बसत आहे. शुक्रवारी (दि. १४) रोजीही “सर्व्हर’च डाऊन’ झाल्याने पक्षकारांनाही नाहक मनःस्ताप सहन करावा लागला.
राज्यातील ५३९ दुय्यम निबंधक कार्यालयासाठी या प्रणालीकरिता एकच सर्व्हर वापरला जातो. मागील काही दिवसांत सर्व्हरचे स्पीड कमी होत आहे. दहा ते पंधरा मिनिटांत एका दस्ताचे संगणकीय कामकाज होते. संपूर्ण दस्त नोंदणीची प्रक्रिया अर्ध्या तासात पूर्ण होते. मात्र, नोंदणीसाठी आलेल्या दस्तांची संख्या आणि सर्व्हरचे स्पीड यामुळे दस्त नोंदणीला वेळ लागत आहे. त्यातच “सर्व्हर डाऊन’ झाल्यास अख्खा दिवस वायाला जात असल्याची तक्रार ऍड. गोरक्षनाथ झोळ यांनी केली.
मुद्रांक व नोंदणी विभागाने २००२ पासून दस्त नोंदणीसाठी “सारथी’ या संगणकीय प्रणालीचा वापर सुरू केला आहे. २०१२ पासून दस्त नोंदणीसह अन्य कामांसाठी ऑनलाईन मध्यवर्ती पद्धत सुरू केली. सध्या याच पद्धतीने दस्त नोंदणीचे ऑनलाईन काम केले जात आहे. दस्त नोंदणीसाठी आलेल्या नागरिकांची कामे कमीत कमी वेळेत व्हावीत, याकरिता या प्रणालीचा वापर सुरू केला असला, तरी या प्रणालीच्या “सर्व्हर डाऊन’मुळे ती लोकांसाठीच त्रासदायक ठरू लागली आहे, असेही झोळ म्हणाले















