न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. २० जून २०२६) :- पवना धरणातील उपयुक्त पाणीसाठा केवळ १९ टक्क्यांवर आल्याने पिंपरी-चिंचवड शहराच्या पाणीपुरवठ्यात १५ टक्के कपात करण्यात आली आहे. पुणे पाटबंधारे विभागाने महापालिकेला याबाबत सूचना दिल्यानंतर शुक्रवार (दि. १९ जून) पासून ही कपात लागू करण्यात आली आहे.
यंदा मान्सूनच्या आगमनास झालेल्या विलंबामुळे धरणातील पाणीसाठ्यावर ताण निर्माण झाला आहे. आगामी काळातील पाण्याची उपलब्धता आणि शहराची वाढती मागणी लक्षात घेऊन उपलब्ध पाण्याचे नियोजनबद्ध व्यवस्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती महापालिकेच्या वतीने देण्यात आली.
मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे यांनी सांगितले की, पाटबंधारे विभागाच्या सूचनेनुसार शहरातील पाणीपुरवठ्यात आवश्यक ती कपात करण्यात आली आहे.
महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी नागरिकांना पाणी काटकसरीने वापरण्याचे आवाहन केले आहे. वाहन धुणे, बागांना अतिरिक्त पाणी देणे तसेच नळ विनाकारण सुरू ठेवणे टाळून पाणी बचतीत सक्रिय सहभाग नोंदवावा, असे त्यांनी म्हटले आहे.















