न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. १८ जून २०२६) :- भोसरीतील लांडगेनगर परिसरातील नागरिकांना अनेक दिवसांपासून भेडसावत असलेल्या कमी दाबाच्या व वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्याच्या समस्येवर अखेर तोडगा निघाला आहे. स्थानिक नागरिकांच्या तक्रारीची दखल घेत भाजपा आमदार महेश लांडगे यांनी महावितरण प्रशासनाशी समन्वय साधून तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या.
त्याअनुषंगाने परिसरात २०० मीटर एल.टी. केबल टाकण्यात आली असून नवीन ४-वे फिडर पिलर बसविण्यात आला आहे. त्यामुळे वीजपुरवठा अधिक सक्षम व सुरळीत झाला असून नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
आमदार महेश लांडगे यांनी सांगितले की, वाढती वीज मागणी लक्षात घेऊन मतदारसंघातील विद्युत पायाभूत सुविधा बळकट करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. मोशी सफारी पार्क, चऱ्होली येथील अतिउच्चदाब उपकेंद्रे, भोसरीतील नवीन स्विचिंग उपकेंद्र तसेच ओव्हरहेड वीजवाहिन्यांचे भूमिगतकरण यांसारख्या महत्त्वाच्या प्रकल्पांना गती देण्यात आली आहे. नागरिकांना दर्जेदार व अखंडित वीजपुरवठा मिळावा, हीच प्राथमिकता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.














