- कचरा टाकणे, जाळणे व प्लास्टिकबंदी उल्लंघनावर महापालिकेची कारवाई…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. २० जून २०२६) :- स्वच्छता नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात पिंपरी-चिंचवड महापालिकेने धडक कारवाई मोहीम राबवून विविध भागांतून ४४ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभाग आणि ग्रीन मार्शल पथकाने ही मोहीम राबविली.
रहाटणी-थेरगाव परिसरात सार्वजनिक रस्त्यावर कचरा टाकणाऱ्या टेम्पोवर ५ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला. तर रावेतमधील एका व्यावसायिक आस्थापनाकडून कचरा जाळल्याचे आढळून आल्याने २५ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.
‘क’ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत भाजी मंडई परिसरात विशेष तपासणी मोहीम राबवून प्लास्टिकबंदीचे उल्लंघन, कचरा टाकणे आणि अस्वच्छता करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईत १४ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला तसेच सुमारे १० किलो बंदी घातलेले प्लास्टिक जप्त करण्यात आले.
नागरिकांनी स्वच्छता नियमांचे पालन करून शहर स्वच्छ ठेवण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन उपआयुक्त डॉ. प्रदीप ठेंगल यांनी केले.















