- २२ जून रोजी मंत्रालयात उच्चस्तरीय आढावा; आमदार महेश लांडगे यांच्या पाठपुराव्याला यश…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. २० जून २०२६) :- पिंपरी-चिंचवड शहराच्या विकासाशी संबंधित महसूल, वन विभाग, भूमी अभिलेख तसेच गावठाण हद्दीतील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या प्रश्नांवर २२ जून रोजी मंत्रालयात उच्चस्तरीय बैठका होणार आहेत. राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीत विविध प्रलंबित विषयांचा सविस्तर आढावा घेऊन आवश्यक निर्णय घेतले जाणार आहेत.
सकाळी ११ वाजता महसूल व वन विभागाशी संबंधित विषयांवर बैठक होणार असून वनविभागाशी संबंधित प्रश्न तसेच हिंजवडी ते नवी सांगवी नदी सुधार प्रकल्पाच्या अनुषंगाने खडकी, डुडुळगाव, चऱ्होली बुद्रुक आणि तळवडे येथील गावठाण हद्दीतील प्रश्नांवर चर्चा होणार आहे. सायंकाळी ५ वाजता महसूल विभागाच्या बैठकीत भूमी अभिलेख विभागातील पिंपरी-चिंचवड नवनगर कार्यालयाशी संबंधित प्रकरणे आणि विविध गावठाण हद्दीतील प्रलंबित विषयांचा आढावा घेतला जाणार आहे.
या बैठकींना आमदार महेश लांडगे, महसूल व वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी, पुणे विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
शहरातील अनेक विकास प्रकल्प वन, महसूल, भूमी अभिलेख आणि प्रशासकीय प्रक्रियांमुळे रखडले आहेत. या पार्श्वभूमीवर सर्व विभागांना एकत्र आणून निर्णय प्रक्रियेला गती देण्यासाठी आमदार महेश लांडगे यांनी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता.
या बैठकीत प्रलंबित मंजुरी, प्रशासकीय अडथळे आणि विकासकामांबाबत स्पष्ट निर्देश दिले जाण्याची अपेक्षा असून शहरातील अनेक महत्त्वाचे प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.














