- योग आणि ध्यानातून निरोगी जीवनाचा संदेश…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. २० जून २०२६) :- क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले संचालित न्यू सिटी प्राईड इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने श्री माताजी निर्मलादेवी सहजयोग ट्रस्टच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी योग व ध्यान सत्राचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमात पूजा चंदा, विक्रम चंदा, नेहा अस्थाना, संतोष मालविया, अमृता वेंगीनावार, प्रीती भामे, पंकज रोडे आणि संजय किसल यांनी विद्यार्थ्यांना योगाचे महत्त्व समजावून सांगितले. तसेच विविध योगासने आणि ध्यानाचे प्रात्यक्षिक करून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष सहभाग घेण्यास प्रोत्साहित केले.
कार्यक्रमास संस्थेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार, उपमुख्याध्यापक सचिन कळसाईत, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. योगामुळे शारीरिक व मानसिक आरोग्य सुदृढ राहण्यास मदत होते, तसेच एकाग्रता आणि सकारात्मकता वाढते, असा संदेश यावेळी देण्यात आला.
विद्यार्थ्यांनी योगासनांमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला. संपूर्ण कार्यक्रम प्रेरणादायी आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सौ. सोनाली पतंगे यांनी केले.















