न्यूज पीसीएमसी नेटवर्क
तळेगाव दाभाडे| दि. २२ जून २०२६ :- तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक १० ‘अ’ मधील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे नगरसेवक मजनू ऊर्फ मदन हनुमंत नाटेकर यांचे जात प्रमाणपत्र जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने अवैध ठरविले आहे. ही माहिती तक्रारदार तथा जमीन हक्क परिषदेच्या राज्याध्यक्ष करुणा प्रकाश सरोदे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सरोदे यांनी सांगितले की, नाटेकर यांनी अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या प्रभागातून निवडणूक लढविली होती. त्यांनी महार समाजाचे जात प्रमाणपत्र बेकायदेशीर कागदपत्रांच्या आधारे मिळविल्याचा आरोप करण्यात आला होता. याबाबत जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे तक्रार दाखल करण्यात आली होती.
समितीचे अध्यक्ष अमोल यादव, सदस्य सचिव शिवकांत चिकुर्ते आणि सदस्य संजय दाणे यांनी दिलेल्या निर्णयानुसार नाटेकर यांचा महार जातीचा दावा अमान्य करण्यात आला असून त्यांचे जात प्रमाणपत्र रद्द करण्यात आले आहे. या निर्णयामुळे स्थानिक राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.















