न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड | दि. २२ जून २०२६ :- पिंपरी-चिंचवडच्या भोसरी औद्योगिक क्षेत्रातील (एमआयडीसी) नैसर्गिक नाल्यांवर ५० हून अधिक कंपनी मालकांनी अनधिकृत अतिक्रमणे केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
स्थानिक राजकीय नेत्यांच्या वरदहस्तामुळे अनेक कंपन्यांनी नाले बुजवून त्यावर पक्की बांधकामे उभारल्याचा आरोप होत आहे. काहींनी राडारोडा टाकून नाले पूर्णपणे बंद केले आहेत, तर काहींनी नाल्यांच्या पात्रातच भिंती, शेड आणि इमारती उभारल्या आहेत.
यामुळे पाण्याचा नैसर्गिक प्रवाह अडथळित झाला असून पावसाळ्यात एमआयडीसीतील अनेक भागांमध्ये जलमय परिस्थिती निर्माण होत आहे. वाढत्या तक्रारींची दखल घेत पिंपरी-चिंचवड महापालिकेने संबंधित कंपन्यांना नोटिसा बजावल्या असून तात्काळ अतिक्रमणे हटवण्याचे आदेश दिले आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाईचा इशारा प्रशासनाने दिला आहे.















