न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड | दि. २२ जून २०२६ :-पिंपरी-चिंचवड शहरातील एका व्यक्तीची पे-पाल (PayPal) कंपनीमध्ये नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवत तब्बल १ लाख ७२ हजार २०० रुपयांची ऑनलाइन फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी लिंक्डइन सोशल मीडियाच्या माध्यमातून तसेच व्हॉट्सअॅप क्रमांक वरून फिर्यादीशी संपर्क साधला. स्वतःला पे-पाल कंपनीचा डायरेक्टर गौरव शर्मा असल्याचे भासवत प्रभावी जॉब प्रोफाइल तयार करून देण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर बनावट मुलाखत घेऊन फिर्यादीचा विश्वास संपादन करण्यात आला.
यानंतर आरोपींनी आर्थिक अडचणीत असल्याचे खोटे कारण सांगून करूर वैश्य बँकेतील आर. कुमार एस. यांच्या नावाच्या खात्यावर विविध टप्प्यांत १,७२,२०० रुपये ऑनलाइन जमा करण्यास भाग पाडले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादीने सांगवी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलीस निरीक्षक नांदेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू असून अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.















