- कोट्यवधी खर्चून उभारलेली आरोग्यवर्धिनी केंद्रे अडगळीत…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड | २३ जून २०२६ :- केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘आयुष्मान भारत’ योजनेअंतर्गत उभारण्यात आलेली ‘आयुष्मान आरोग्य मंदिरे’ अर्थात आरोग्यवर्धिनी केंद्रे पिंपरी-चिंचवड शहरात अनेक ठिकाणी निष्क्रिय अवस्थेत असल्याचे चित्र समोर आले आहे. नागरिकांच्या घराजवळ मोफत आणि दर्जेदार प्राथमिक आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याचा उद्देश असलेल्या या केंद्रांमध्ये वैद्यकीय अधिकारीच नसल्याने अनेक ठिकाणी कुलूप लटकताना दिसत आहे.
माता-बाल आरोग्य, लसीकरण, मधुमेह, रक्तदाब, कर्करोग तपासणी, टीबी उपचार, मानसिक आरोग्य समुपदेशन, ज्येष्ठ नागरिकांची काळजी अशा १२ प्रकारच्या सेवा देण्याचा दावा करण्यात आला होता. मात्र प्रत्यक्षात अनेक केंद्रांमध्ये रुग्णांना डॉक्टर उपलब्ध नसल्याने सेवा मिळत नसल्याची तक्रार नागरिकांकडून केली जात आहे.
मोदी सरकारच्या आरोग्य क्षेत्रातील महत्त्वाच्या योजनेची शहरात अशी दुर्दशा झाल्याने प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. केंद्र सरकार निधी देत असताना आणि सुविधा उभारण्यात आल्या असताना मनुष्यबळ भरतीतील विलंबामुळे योजना कागदावरच राहिल्याची टीका होत आहे.
दरम्यान, आरोग्य विभागाने वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती प्रक्रिया पूर्ण झाली असून पुढील १५ दिवसांत सर्व केंद्रे पूर्ण क्षमतेने सुरू होतील, असा दावा केला आहे. मात्र अनेक महिन्यांपासून सेवा बंद असल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
“आरोग्यवर्धिनी केंद्रांसाठी यापूर्वी ७९ वैद्यकीय अधिकाऱ्यांची भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती. मात्र, आवश्यक पात्रतेचे उमेदवार उपलब्ध न झाल्याने नियुक्त्या पूर्ण होऊ शकल्या नाहीत. त्यानंतर निवडणूक आचारसंहिता लागू झाल्याने नवीन भरती प्रक्रिया राबविण्यात अडचणी आल्या. आता वैद्यकीय अधिकाऱ्यांची अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात आली असून उमेदवार रुजू होण्यास सुरुवात झाली आहे. पुढील १५ दिवसांत सर्व आरोग्यवर्धिनी केंद्रांमधील सेवा नियमित करण्यात येतील. तसेच कामकाजावर देखरेख ठेवण्यासाठी वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली असून कर्मचाऱ्यांना आवश्यक प्रशिक्षणही दिले जाणार आहे.”
– डॉ. लक्ष्मण गोफणे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी…















