न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड | २३ जून २०२६ :- कासारवाडी मेट्रो स्थानकाच्या पुलाखाली पावसापासून बचाव करण्यासाठी थांबलेल्या दुचाकीस्वारांना शिवाई बसने धडक दिल्याची घटना सोमवारी (दि. २२) दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली. या अपघातात एक जण गंभीर तर तिघे किरकोळ जखमी झाले आहेत. अपघातामुळे मुंबई-पुणे मार्गावर सुमारे दीड तास वाहतूक कोंडी झाली होती.
किरण वामन महाजन (वय ५६, रा. चिखली), दिव्या रुसूल ओबेरॉय (४०, रा. भोसरी), हर्षल अब्दुल खान (३९, रा. भवानी पेठ) आणि ऋषिकेश उत्तम हंद्राळे (२७, रा. धनकवडी) हे जखमी झाले आहेत. यापैकी किरण महाजन यांच्यावर पिंपरीतील वायसीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पावसामुळे काही दुचाकीस्वार पुलाखाली थांबले असताना भरधाव शिवाई बसवरील चालकाचा ताबा सुटल्याने बसने दुचाकींना जोरदार धडक दिली. एका दुचाकीचा बसखाली चक्काचूर झाला. स्थानिक नागरिक व पोलिसांनी तत्काळ मदतकार्य करून जखमींना बाहेर काढत रुग्णालयात दाखल केले. पोलिस पुढील तपास करत आहेत.















