- कंपनी अधिकाऱ्याचे अपहरण करून मारहाण, चौघांना अटक…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २९ जून २०२६) :- आईला कामावरून काढून टाकल्याचा राग मनात धरून एका कामगाराने आपल्या साथीदारांसह खासगी कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याचे अपहरण करून त्यांना खंडणीवजा धमक्या देत मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी चिखली पोलिसांनी चौघांना अटक केली आहे.
याबाबत विन्सेन्ट जोसेफ डिसील्वा (वय ५७, रा. कोंढवा, पुणे) यांनी २७ जून रोजी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार शांताराम तयप्पा शिंदे (रा. नेहरूनगर, पिंपरी), साहिल संदीप घाडगे (वय २२, रा. रुपीनगर, तळवडे), कृष्णा अनंत काळे (वय २१, रा. त्रिवेणीनगर, चिखली) आणि पियुष मधुकर शेंडगे (वय १८, रा. मोरेवस्ती, चिखली) यांना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी (दि. २४ जून) सायंकाळी सुमारे ५.१५ वाजण्याच्या सुमारास पूर्णानगर, चिखली येथील टाटा कंपनीच्या कार प्लांटच्या मटेरियल गेटजवळ ही घटना घडली. फिर्यादी व कंपनीतील अन्य वरिष्ठ अधिकारी काम आटोपून घरी जाण्यासाठी उभे असताना आरोपी दोन दुचाकींवरून तेथे आले.
आरोपींपैकी एका व्यक्तीच्या आईला कंपनीतून कामावरून कमी करण्यात आल्याचा राग मनात धरून त्यांनी विन्सेन्ट डिसील्वा यांचे अपहरण केले. त्यानंतर त्यांना नेहरूनगर येथील एका घरात नेण्यात आले. तेथे “माझ्या आईला पुन्हा कामावर घ्या आणि माझा पगार वाढवा,” अशी मागणी करत फिर्यादींना खंडणीवजा धमक्या देण्यात आल्या.
फिर्यादींनी कंपनीच्या नियमांमुळे अशा मागण्या मान्य करता येणार नसल्याचे सांगितल्यानंतर आरोपींनी त्यांना मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास चिखली पोलीस करीत आहेत.
















