- उपसंचालक किशोर गोखले यांची पदोन्नतीने बदली…
- त्यांच्या जागी ललित खोब्रागडे यांची नियुक्ती…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २९ जून २०२६) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नगररचना विभागात प्रशासकीय पातळीवर महत्त्वाचे फेरबदल करण्यात आले असून, नगररचना विभागाचे उपसंचालक किशोर गोखले यांची पदोन्नतीने बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी उल्हासनगर महापालिकेतील नगररचना विभागाचे उपसंचालक ललित खोब्रागडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
महापालिकेच्या नगररचना विभागाचे उपसंचालक प्रसाद गायकवाड यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर त्यांची छत्रपती संभाजीनगर येथील वाहतूक व परिवहन विभागातील नगररचना विभागात बदली करण्यात आली होती. त्यानंतर रिक्त झालेल्या पदावर महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागातील संचालक कार्यालयात कार्यरत असलेले किशोर गोखले यांची नियुक्ती करण्यात आली होती.
मात्र, त्यांचा कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच त्यांना सहसंचालक पदावर पदोन्नती देण्यात आली असून, त्यांची बदली करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. गोखले यांनी महापालिकेत वर्षभर विविध विकासकामे आणि नियोजनविषयक कामकाज हाताळले होते.
त्यांच्या बदलीनंतर आता उल्हासनगर महापालिकेतील अधिकारी ललित खोब्रागडे यांच्याकडे पिंपरी-चिंचवडच्या नगररचना विभागाची धुरा सोपविण्यात आली आहे. आगामी काळात शहरातील विकास आराखडे, बांधकाम परवानग्या आणि नगररचना विषयक प्रकल्पांना गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
दरम्यान, राज्य शासनाच्या नगरविकास विभागातील सहसचिव सुबराव शिंदे यांनी नुकतेच संबंधित आदेश जारी केले असून, महापालिकेने किशोर गोखले यांना सेवेतून कार्यमुक्त केले आहे. नवीन नियुक्तीमुळे महापालिकेच्या नगररचना विभागाच्या कामकाजात सातत्य राहणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
















