- कष्टकऱ्यांच्या जीवनात ‘रामराज्य’ – डॉ. बाबा कांबळे…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी | दि. ३० जून २०२६ :- पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे चिखली (घरकुल) येथे ११४ फळ-भाजी विक्रेते, खाद्यपदार्थ, कटलरी, स्टेशनरी व इतर व्यावसायिकांना पारदर्शक ‘लकी ड्रॉ’ पद्धतीने गाळ्यांचे वाटप करण्यात आले.
घरकुल सांस्कृतिक भवन येथे झालेल्या कार्यक्रमात फेरीवाल्यांचे पुनर्वसन करण्यात आले असून, यामुळे कष्टकरी फेरीवाल्यांच्या जीवनात खऱ्या अर्थाने ‘रामराज्य’ अवतरल्याची भावना टपरी पथारी हातगाडी पंचायत व नॅशनल फेरीवाला समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बाबा कांबळे यांनी व्यक्त केली.
घरकुल परिसरातील २०० हून अधिक फेरीवाल्यांपैकी पहिल्या टप्प्यात ६ बाय ८ फुटांचे ओटे बांधून ११४ जणांचे पुनर्वसन करण्यात आले आहे. या ठिकाणी पाणी, वीज व इतर सुविधा उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे. उर्वरित फेरीवाल्यांचेही लवकरच पुनर्वसन करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. या उपक्रमासाठी लोकप्रतिनिधी, महापालिका प्रशासन व भाजप पदाधिकाऱ्यांचे डॉ. कांबळे यांनी आभार मानले.
















