- तहकूब प्रस्ताव पुन्हा मंजुरीसाठी विषयपत्रिकेवर..
- सभापती म्हणाले, ‘धोरणानंतरच मंजुरी’; मग क्रीडा विषय पुन्हा पत्रिकेवर कसे?…
मा. अशोक लोखंडे :- संपादक तथा प्रतिनिधी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी | दि. ३० जून २०२६ :- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या क्रीडा विभागाशी संबंधित प्रस्ताव गत स्थायी समितीच्या बैठकीत तहकूब करण्यात आले होते. क्रीडा समितीचे धोरण मंजूर झाल्यानंतरच अशा प्रकारचे प्रस्ताव मंजूर करण्यात येतील, अशी भूमिका स्थायी समितीचे सभापती अभिषेक बारणे यांनी पत्रकार परिषदेत जाहीरपणे मांडली होती. मात्र, तेच प्रस्ताव आता पुन्हा एकदा मंजुरीसाठी स्थायी समितीच्या विषयपत्रिकेवर आल्याने चर्चांना उधाण आले आहे.
स्थायी समितीसमोर बुधवारी होणाऱ्या बैठकीत तीन महत्त्वाचे प्रस्ताव ठेवण्यात आले आहेत. त्यामध्ये मासुळकर कॉलनी येथील डॉ. हेडगेवार क्रीडा संकुलातील व्यायामशाळा जागृती स्पोर्ट्स फाउंडेशन या संस्थेला ११ महिन्यांच्या कराराने चालविण्यास देण्याचा प्रस्ताव आहे.
तसेच, कासारवाडी येथील जय महाराष्ट्र व्यायाम मंडळाला व्यायामशाळा व बॅडमिंटन हॉल चालविण्यासाठी मुदतवाढ देण्याचा प्रस्तावही विषयपत्रिकेत समाविष्ट करण्यात आला आहे.
याशिवाय प्राधिकरण परिसरातील गुरुवर्य दादोजी कोंडदेव व्यायामशाळा ही श्री लोकेश बागल यांच्या श्री भैरवनाथ मित्र मंडळ संस्थेस चालविण्यास देण्यासंदर्भातील विषयही स्थायी समितीसमोर मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे.
विशेष म्हणजे, हे सर्व प्रस्ताव यापूर्वी तहकूब करण्यात आले होते. क्रीडा धोरण अंतिम झाल्यानंतरच अशा विषयांना मंजुरी देण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले होते. मात्र, अद्याप क्रीडा धोरणास अंतिम मंजुरी मिळालेली नसताना हे विषय पुन्हा चर्चेसाठी समोर आल्याने प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांच्या भूमिकेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. दरम्यान, स्थायी समितीच्या बैठकीत या प्रस्तावांबाबत नेमका काय निर्णय होतो, याकडे क्रीडा क्षेत्रासह राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
















