- चिंचवडचे दोन तरूण गजाआड…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड | दि. ३० जून २०२६ :- पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या प्रतिबंधात्मक आदेशांचे उल्लंघन करून विनापरवाना देशी बनावटीची पिस्तुले बाळगणाऱ्या दोन जणांना गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. ही कारवाई सोमाटणे फाटा येथील हॉटेल न्यू डायमंडसमोर देहूरोडकडे जाणाऱ्या रस्त्यावर रविवारी (दि. २९) सायंकाळी ५.२५ वाजता करण्यात आली.
पप्पू उर्फ विनोद पवार (वय २६, रा. चिंचवड) आणि रोहन सावंत (वय २४, रा. चिंचवड) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून दोन देशी बनावटीची पिस्तुले आणि दोन जिवंत काडतुसे जप्त केली आहेत.
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तांनी लागू केलेल्या १४ दिवसांच्या प्रतिबंधात्मक आदेशादरम्यान शस्त्रे बाळगण्यास बंदी असतानाही आरोपींनी विनापरवाना शस्त्रे जवळ बाळगल्याचे तपासात निष्पन्न झाले. याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक मोहारे पुढील तपास करीत आहेत.















