- भाजपच्या ३० कार्यकर्त्यांना मिळणार नेतृत्वाची संधी..
- क्षेत्रीय समित्यांवरील नियुक्त्यांसाठी भाजपमध्ये मोर्चेबांधणी सुरू…
मा. अशोक लोखंडे :- संपादक तथा प्रतिनिधी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. ०१ जुलै २०२६) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रशासनाला अधिक गतिमान, लोकाभिमुख आणि नागरिकांसाठी सुलभ करण्याच्या उद्देशाने नव्याने स्थापन करण्यात आलेल्या दहा क्षेत्रीय कार्यालयांच्या माध्यमातून भाजपच्या ३० कार्यकर्त्यांना राजकीय संधी उपलब्ध होणार आहे. प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयासाठी तीन स्वीकृत सदस्यांची नियुक्ती केली जाणार असून, त्यासाठी इच्छुक कार्यकर्त्यांमध्ये आतापासूनच चुरस निर्माण झाली आहे.
महापालिकेच्या नव्या प्रशासकीय रचनेनुसार रहाटणी, निगडी, भोसरी, चिंचवड, तळवडे, प्राधिकरण, थेरगाव, आकुर्डी, सांगवी आणि मोशी या भागांमध्ये क्षेत्रीय कार्यालयांची विभागणी करण्यात आली असून, आज (बुधवार) पासून ही सर्व दहा कार्यालये कार्यान्वित होत आहेत.
३० कार्यकर्त्यांना संधी मिळणार…
सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे यांनी सांगितले की, क्षेत्रीय समिती अध्यक्षपदांची निवड प्रक्रिया येत्या १५ जुलैपर्यंत पूर्ण केली जाणार आहे. तसेच प्रत्येक क्षेत्रीय कार्यालय समितीवर तीन स्वीकृत सदस्यांची नियुक्ती करण्यात येणार असून, त्याद्वारे भाजपच्या एकूण ३० कार्यकर्त्यांना संधी मिळणार आहे. या पदांसाठी संबंधित क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत वास्तव्यास असलेली व्यक्ती पात्र ठरणार असल्याने इच्छुकांनी पक्ष संघटनेत मोर्चेबांधणी सुरू केली आहे. शहराध्यक्ष, आमदार आणि वरिष्ठ पदाधिकाऱ्यांशी संपर्क वाढवून आपली दावेदारी मजबूत करण्यासाठी विविध स्तरांवर प्रयत्न सुरू असल्याचे पक्षातील सूत्रांनी सांगितले.
क्षेत्रीय समिती अध्यक्षांना इलेक्ट्रिक वाहने…
दरम्यान, नव्या धोरणानुसार सर्व क्षेत्रीय समिती अध्यक्षांना महापालिकेकडून इलेक्ट्रिक वाहने उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. महापालिकेने पर्यावरणपूरक धोरण स्वीकारत भविष्यात केवळ इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करण्याचा निर्णय घेतला असून, त्यासाठी वाहन खरेदीस स्थायी समितीची मंजुरीदेखील मिळाली आहे. महापालिकेच्या सर्व दहा क्षेत्रीय समित्यांच्या अध्यक्षपदी भाजपचे नगरसेवक विराजमान होणार असून, आगामी पंधरवड्यात या नियुक्त्यांची राजकीय समीकरणे अधिक स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
इच्छुक कार्यकर्त्यांना नेतृत्वाची संधी…
महापालिकेतील स्वीकृत सदस्य नियुक्तीचा विषय सध्या दप्तरी दाखल असला, तरी नव्या क्षेत्रीय समित्यांमुळे इच्छुक कार्यकर्त्यांसाठी स्थानिक पातळीवर नेतृत्वाची नवी संधी निर्माण झाली आहे. त्यामुळे आगामी काळात या नियुक्त्यांकडे राजकीय वर्तुळाचे विशेष लक्ष लागले आहे.
















