- अनं मग पक्षनेत्यांची तंबी..
- आता शिस्तीच्या डोससाठी मुंबईत तीन दिवसीय प्रशिक्षण शिबिर…
संतोष जराड, प्रतिनिधी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. ०१ जुलै २०२६) :- पिंपरी चिंचवड महापालिकेतील भाजप नगरसेवकांनी पक्षाच्या अधिकृत भूमिकेच्या विरोधात सार्वजनिक वक्तव्ये करू नयेत, अन्यथा शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे यांनी पत्रकार परिषदेत दिला. महापालिका सभागृहात कोअर कमिटीने निश्चित केलेल्या विषयांवरच पदाधिकारी आणि नगरसेवकांनी भूमिका मांडाव्यात, असे धोरण पक्षाने स्वीकारले आहे, अशी माहिती त्यांनी पत्रकारांना दिली.
महापालिकेत भाजपची सत्ता आल्यानंतर पक्षातील अंतर्गत मतभेद, पुनावळे येथील आरक्षित जागा खासगी संस्थेला देण्याच्या प्रस्तावावरील विरोध, तसेच ६० कोटी रुपयांच्या आर्थिक प्रकरणावर नगरसेवकांनी केलेल्या वक्तव्यांमुळे पक्षाची प्रतिमा मलिन होत असल्याची चर्चा आहे. काही नगरसेवकांनी पक्षाच्या अधिकृत भूमिकेच्या विरोधात भूमिका घेतल्याने सत्ताधारी पदाधिकाऱ्यांची कोंडी झाली होती.
अनेक नगरसेवक प्रथमच निवडून आल्याने त्यांना सभागृहाचे नियम, प्रशासकीय प्रक्रिया आणि कामकाजाची पद्धत पुरेशी माहिती नसल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे प्रदेश नेतृत्वाने हस्तक्षेप करत स्थानिक पदाधिकाऱ्यांना समन्वय राखण्याच्या सूचना दिल्याची माहिती आहे.
नगरसेवकांची तीन दिवस शाळा…
या पार्श्वभूमीवर भाजपसह सर्व पक्षीय नगरसेवकांसाठी १०, ११ आणि १२ जुलै रोजी तीन दिवसीय प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबईतील रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी येथे होणाऱ्या या शिबिरात सभागृहाचे नियम, प्रशासनाशी समन्वय, स्थानिक स्वराज्य संस्थांचे अधिकार आणि प्रभावी लोकप्रतिनिधित्व याविषयी मार्गदर्शन केले जाणार आहे. या प्रशिक्षणातून नगरसेवकांचे कौशल्य वाढवून महापालिकेचे कामकाज अधिक शिस्तबद्ध करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
















