- विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांची आयुक्तांकडे मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. ०१ जुलै २०२६) :-पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, पिंपरी-चिंचवड शहरातील शाळांच्या परिसरातील धोकादायक व मोडकळीस आलेली झाडे, जुने विद्युत खांब, होर्डिंग्ज, केबल लाईन, चेंबरची झाकणे तसेच जीर्ण इमारती व वाड्यांचे तातडीने सर्वेक्षण करून आवश्यक कारवाई करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.
मुंबईतील चेंबूर येथे शाळेच्या बसवर झाड कोसळून एका विद्यार्थ्याचा मृत्यू झालेल्या दुर्दैवी घटनेचा संदर्भ देत भोईर यांनी पिंपरी-चिंचवडमध्ये अशाप्रकारची दुर्घटना घडू नये, यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याची आवश्यकता व्यक्त केली आहे.
शहरातील अनेक शाळांच्या परिसरात जुनी व जीर्णावस्थेतील झाडे, मोडकळीस आलेले विद्युत खांब, मोठे होर्डिंग्ज, सैल झालेल्या केबल लाईन्स, उघडी चेंबर्स आणि धोकादायक इमारती असल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
पावसाळ्यातील संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभाग, उद्यान विभाग तसेच संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना तातडीने सूचना देऊन शाळा परिसरासह सार्वजनिक ठिकाणी आवश्यक ती उपाययोजना करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. विद्यार्थ्यांच्या जीवितास कोणताही धोका निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासनाने विशेष दक्षता घ्यावी, अशी विनंती भाऊसाहेब भोईर यांनी केली आहे.
















