- शुल्क भरूनही परवानगी रखडली…
- वारकऱ्यांच्या सेवेसाठी तातडीने मंजुरी द्या – सचिन काळभोर…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि.०२ जुलै २०२६) :- संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर निगडी बसस्टॉप, मुंबई-पुणे महामार्ग परिसरात मंडप व स्वागत कक्ष उभारण्यासाठी आवश्यक शुल्क भरूनही महानगरपालिकेकडून अंतिम परवानगी देण्यात आलेली नसल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते सचिन काळभोर यांनी केला आहे. या प्रकरणात राजकीय दबावामुळे परवानगी जाणीवपूर्वक रखडविण्यात येत असल्याचा दावा करत त्यांनी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडे तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे.
काळभोर यांनी दिलेल्या निवेदनानुसार, वारकरी बांधवांच्या सेवेसाठी मंडप व स्वागत कक्ष उभारण्यासंदर्भात महानगरपालिका, निगडी पोलीस ठाणे, निगडी वाहतूक शाखा आणि संबंधित विभागांकडे आवश्यक अर्ज सादर करण्यात आले होते. निगडी पोलिसांकडून ‘ना हरकत प्रमाणपत्र’ (NOC) मिळाल्यानंतर सर्व कागदपत्रे महानगरपालिकेच्या ‘अ’ क्षेत्रीय कार्यालयात जमा करण्यात आली.
महानगरपालिकेने मंडप परवानगी शुल्क भरण्याबाबत सूचना दिल्यानंतर १ जुलै २०२६ रोजी विहित शुल्क भरून अधिकृत पावतीही प्राप्त झाल्याचा दावा काळभोर यांनी केला आहे. मात्र, सर्व प्रक्रिया पूर्ण करूनही अंतिम परवानगी अद्याप देण्यात आलेली नसल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
प्रस्तावित मंडपामध्ये संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या वारकरी बांधवांसाठी मोफत अन्नदान, चहा-नाश्ता, वैद्यकीय मदत, औषधांचे वाटप, रेनकोट व छत्र्यांचे वितरण तसेच स्वागत कक्षाची सुविधा उपलब्ध करून देण्याचे नियोजन असल्याचे काळभोर यांनी सांगितले आहे. हा उपक्रम सामाजिक व सेवाभावी स्वरूपाचा असल्याने प्रशासनाने तातडीने परवानगी द्यावी, अशी त्यांनी मागणी केली आहे.
यासंदर्भात पिंपरी-चिंचवडचे महापौर रवी लांडगे यांनीदेखील आयुक्तांकडे मंडप परवानगी देण्याबाबत लेखी निवेदन दिल्याचा दावा काळभोर यांनी केला आहे. शुल्क स्वीकारल्यानंतरही परवानगी प्रलंबित ठेवण्यामागील कारणांची चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
दरम्यान, संत तुकाराम महाराज पालखी सोहळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना वारकऱ्यांच्या सेवेसाठी प्रस्तावित मंडपाला प्रशासनाकडून वेळेत मंजुरी मिळणार का, याकडे लक्ष लागले आहे.
मंडप परवानगी रखडल्याबाबतचे आरोप हे सचिन काळभोर यांनी केलेले दावे आहेत. या प्रकरणावर पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रशासनाची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही.
















