- चिंचवडमधील आरक्षण क्रमांक ३०१ च्या विकास आराखड्यावर प्रश्नचिन्ह?…
मा. अशोक लोखंडे :- संपादक तथा प्रतिनिधी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड | २ जुलै २०२६ :- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विकास आराखड्यात पर्यटन केंद्रासाठी आरक्षित असलेल्या चिंचवड येथील आरक्षण क्रमांक ३०१ या जागेबाबत धक्कादायक माहिती समोर आल्याने खळबळ उडाली आहे.
महापालिकेच्या ताब्यात असलेली आणि पर्यटन केंद्रासाठी राखीव ठेवण्यात आलेली ही जागा महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) प्लॉटिंग करून खासगी उद्योजकांना विक्री करण्याच्या तयारीत असल्याची बाब समोर आला आहे.
विशेष म्हणजे, जुन्या मंजूर विकास आराखड्यासह नव्या प्रारूप विकास आराखड्यातही संबंधित जागेवरील पर्यटन आरक्षण कायम ठेवण्यात आले आहे. त्यामुळे या जागेचा वापर पर्यटन विकासासाठी होणे अपेक्षित असताना, तिचे व्यावसायिक प्लॉटिंग करण्याच्या कथित हालचालींमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
सद्यस्थितीत संबंधित जागा पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ताब्यात असल्याचे सांगितले जात आहे. असे असतानाही MIDC ने या जागेवर प्लॉटिंग करून खासगी उद्योजकांना भूखंड विक्रीचे नियोजन केल्याची माहिती समोर आल्याने प्रशासनातील समन्वयावरही प्रश्न उपस्थित होत आहेत.
दरम्यान विकास आराखड्यातील आरक्षण बदलल्याशिवाय किंवा कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय अशा प्रकारचे नियोजन करता येते का, याबाबतही उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.
“चिंचवड येथील आरक्षण क्रमांक ३०१ ही जागा विकास आराखड्यात पर्यटन केंद्रासाठी आरक्षित असून, त्याचे मूळ स्वरूप कायम राहणे अत्यंत आवश्यक आहे. विकास आराखड्याला बाधा पोहोचविणारे कोणतेही नियोजन स्वीकारले जाणार नाही. या परिसरात मोठ्या प्रमाणात निवासी वस्ती तसेच एमआयडीसीची कामगार गृहनिर्माण योजना असल्यामुळे नागरिकांच्या हिताचा विचार करून पर्यटन आरक्षण अबाधित ठेवावे. संबंधित नियोजन तातडीने रद्द करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत.”
– आ. अण्णा बनसोडे, विधानसभा उपाध्यक्ष…















