- काळेवाडीतील कृष्णा गार्डन सोसायटीतील घटना; आरोपी चुलता अटकेत…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि.०२ जुलै २०२६) :- काळेवाडी परिसरातील कृष्णा गार्डन सोसायटीमध्ये घराच्या वाटणीच्या व कौटुंबिक वादातून चुलत्याने पुतण्याच्या डोक्यात लोखंडी रॉडने वार करून त्याचा खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी काळेवाडी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार १ जुलै २०२६ रोजी सकाळी ११.४० ते दुपारी २.०० वाजण्याच्या दरम्यान कृष्णा गार्डन सोसायटी, सी विंग, फ्लॅट क्रमांक १९, जीवन चौक, काळेवाडी येथे घडला.
या प्रकरणी रोशन ऊर्फ मयुर राजेंद्र पाखरे (वय २९, रा. पाचपिर चौकाजवळ, काळेवाडी) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी संजय उमाजी पाखरे (वय ६२, रा. कृष्णा गार्डन सोसायटी, काळेवाडी) यांना आरोपी म्हणून अटक केली आहे.
प्राथमिक तपासानुसार, घराच्या वाटणीचा वाद, गणेश पाखरे यांना लागलेली नोकरी तसेच पत्नी व मुले आपल्याला सोडून जाण्यास फिर्यादीच्या कुटुंबालाच जबाबदार असल्याचा आरोपीला संशय होता. या रागातून आरोपीने फिर्यादीचा भाऊ गणेश राजेंद्र पाखरे (वय ३२) यांच्या डोक्यात लोखंडी रॉडने वार करून त्यांचा खून केल्याचा आरोप आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) धुमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली काळेवाडी पोलीस करत आहेत.
















