- कंपनी मालक, सुपरवायझर आणि लेबर कॉन्ट्रॅक्टरविरोधात गुन्हा…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
मोशी (दि.०२ जुलै २०२६) :- मोशी येथील एका कंपनीत तांत्रिक प्रशिक्षण नसतानाही हेल्परला प्रेस शॉप मशीनवर ऑपरेटर म्हणून काम करण्यास लावल्याने झालेल्या अपघातात त्याचा मृत्यू झाल्याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलिसांनी कंपनी मालक, सुपरवायझर आणि लेबर कॉन्ट्रॅक्टरविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना १ जुलै २०२६ रोजी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास गोडाऊन चौक, ए/१ स्टॅपिंग कंपनी, सर्व्हे क्रमांक ४४१/१, खडी मशीन रोड, मोशी येथे घडली.
या प्रकरणी बुंदेला रामधुजनिशाद (वय २३) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी संदेश प्रभुराव पांडे (वय ५२, रा. वडमुखवाडी), सुपरवायझर बाळाजी पंढरीनाथ आलुरे (वय ४६, रा. बोराटेवस्ती, मोशी) आणि लेबर कॉन्ट्रॅक्टर दीपक शिवाजी राळे (वय २८, रा. वडमुखवाडी रोड, पुणे) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादीनुसार, त्यांचा भाऊ बारावी उत्तीर्ण असून कंपनीत हेल्पर म्हणून कार्यरत होता. त्याला प्रेस मशीनसंदर्भातील कोणतेही तांत्रिक प्रशिक्षण किंवा अनुभव नसतानाही आरोपींनी त्याला प्रेस शॉप मशीनवर ऑपरेटर म्हणून काम करण्यास लावले. काम सुरू असताना मशीनमधील लोखंडी जॉब उडून त्याच्या गळ्याला लागल्याने तो गंभीर जखमी झाला. उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.
या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक खोसे यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी भोसरी पोलीस करत आहेत.
















