पुणे–नाशिक महामार्ग भूसंपादनासाठी राज्य शासनाकडे निधीची मागणी…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि.०२ जुलै २०२६) :- पुणे–नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील नाशिक फाटा ते खेड-राजगुरूनगर मार्गाच्या रखडलेल्या भूसंपादन प्रक्रियेला गती देण्यासाठी राज्य शासनाने तातडीने निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी भाजपा आमदार महेश लांडगे यांनी विधानसभेत औचित्याच्या मुद्याद्वारे केली.
राज्य शासनाकडून निधी मिळेपर्यंत पिंपरी-चिंचवड महानगरपालिका (PCMC) आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) यांनी त्यांच्या अर्थसंकल्पातून तात्पुरता निधी उपलब्ध करून भूसंपादन पूर्ण करावे, अशीही त्यांनी मागणी केली.
वाढत्या नागरीकरणामुळे नाशिक फाटा ते चाकण आणि खेड मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असून, अवघ्या ३० किलोमीटरच्या प्रवासासाठी दोन ते तीन तास लागत असल्याचे त्यांनी सभागृहात नमूद केले.
भूसंपादन वेळेत पूर्ण झाल्यास महामार्गाच्या रुंदीकरणाला गती मिळेल, वाहतूक कोंडी कमी होईल आणि पिंपरी-चिंचवड, चाकण व खेड-राजगुरूनगर परिसरातील औद्योगिक आणि व्यापारी विकासाला मोठी चालना मिळेल, असा विश्वास महेश लांडगे यांनी व्यक्त केला.
















