- विशेष निधी देण्याची मागणी; प्रकल्पाचा खर्च १,७०० कोटींवर…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि.०२ जुलै २०२६) :- पिंपरी-चिंचवड शहराच्या दीर्घकालीन जलसुरक्षेसाठी महत्त्वाचा असलेला पवना बंद जलवाहिनी प्रकल्प तातडीने आणि विहित कालमर्यादेत पूर्ण करावा, अशी आग्रही मागणी चिंचवडचे आमदार शंकर जगताप यांनी गुरुवारी विधिमंडळात औचित्याच्या मुद्द्याद्वारे केली. तसेच प्रकल्पासाठी विशेष निधी आणि आवश्यक प्रशासकीय मंजुऱ्या तातडीने उपलब्ध करून देण्याची मागणीही त्यांनी शासनाकडे केली.
सभागृहात बोलताना जगताप यांनी सांगितले की, पवना धरण ते निगडी सेक्टर-२३ जलशुद्धीकरण केंद्रादरम्यान सुमारे ३६ किलोमीटर लांबीची बंद जलवाहिनी उभारण्यास २००८ मध्ये प्रशासकीय मान्यता मिळाली होती. मात्र, जमीन संपादन, स्थानिक आंदोलने, तांत्रिक अडचणी आणि न्यायालयीन प्रक्रियांमुळे हा प्रकल्प १५ वर्षांहून अधिक काळ रखडला आहे.
या प्रकल्पावर आतापर्यंत सुमारे १७१ ते २०० कोटी रुपये खर्च झाले असून, केवळ ४.५ ते ८ किलोमीटरपर्यंतचेच काम पूर्ण झाले आहे. उर्वरित कामासाठी वाढलेल्या बांधकाम खर्चामुळे प्रकल्पाची सुधारित किंमत आता सुमारे १,७०० कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे.
जगताप यांनी सांगितले की, प्रकल्प पूर्ण झाल्यास बाष्पीभवन, गळती आणि अनधिकृत पाणीउपसा रोखता येईल. त्यामुळे शहराला अतिरिक्त सुमारे १०० एमएलडी पाणी उपलब्ध होईल आणि दरवर्षी अंदाजे १.२९ टीएमसी पाण्याची बचत होणार आहे. त्यामुळे भविष्यातील पाण्याची गरज भागविण्यासाठी हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा ठरणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
















