- बढतीमुळे रिक्त झालेल्या पदांवर नव्या नियुक्त्या…
- बावधन, पिंपरी, वाकड, चिखली, दिघी व रावेत पोलिस ठाण्यांना मिळाले नवे वरिष्ठ…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि.०२ जुलै २०२६) :- पिंपरी-चिंचवड शहर पोलिस दलातील सहा पोलिस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. याबाबतचे आदेश पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी २९ जून रोजी जारी केले. पोलिस निरीक्षकांची सहायक पोलिस आयुक्तपदी पदोन्नती झाल्याने रिक्त झालेल्या पदांवर या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.
आदेशानुसार, गुन्हे शाखेत कार्यरत असलेले पोलिस निरीक्षक अरविंद पवार यांच्याकडे बावधन पोलिस ठाण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तर रुपाली बोबडे यांची पिंपरी पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
चिखली पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विठ्ठल साळुंखे यांची वाकड पोलिस ठाण्यात बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी चिंचवड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रणजित जाधव यांची चिखली पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
तसेच रावेत पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीन फटांगरे यांच्याकडे दिघी पोलिस ठाण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांच्या जागी हिंजवडी पोलिस ठाण्यातील पोलिस निरीक्षक ऋषिकेश घाडगे यांची रावेत पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
पदोन्नतीमुळे झालेल्या रिक्त जागा भरून पोलिस प्रशासनातील कामकाज अधिक प्रभावीपणे सुरू ठेवण्यासाठी या अंतर्गत बदल्या करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.
















