- मातोश्रीवर शहरप्रमुख चेतन पवार यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकाऱ्यांची भेट…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि.०२ जुलै २०२६) :- पुणे जिल्हा संपर्कप्रमुख सचिन आहिर यांनी एकनाथ शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर पिंपरी-चिंचवड शहरातील शिवसेनेचे पदाधिकारी आणि शिवसैनिक पक्ष सोडणार असल्याच्या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला आहे. शहरप्रमुख चेतन पवार यांच्या नेतृत्वाखाली शहरातील पदाधिकारी, शिवसैनिक आणि युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मातोश्री येथे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.
या भेटीदरम्यान सर्व पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर पूर्ण विश्वास व्यक्त करत त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याची ग्वाही दिली. तसेच पिंपरी-चिंचवडमधील कोणताही पदाधिकारी किंवा शिवसैनिक पक्ष सोडून इतरत्र जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले.
यावेळी उद्धव ठाकरे यांनी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना संघटना अधिक मजबूत करण्यासाठी तळागाळात काम करण्याचे मार्गदर्शन केले. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटना बळकट करण्यासाठी एकजुटीने काम करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
या बैठकीमुळे शहरातील शिवसेनेत फूट पडणार असल्याच्या चर्चांना पूर्णविराम मिळाल्याचा दावा पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केला असून, आगामी काळात संघटनात्मक बांधणीवर अधिक भर दिला जाणार असल्याचे सांगण्यात आले.
















