- वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यावर भर…
- तळवडे विभागातील वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यावर उपाययोजनांच्या सूचना…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि.०२ जुलै २०२६) :- पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटना आणि महावितरण भोसरी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार, ३० जून २०२६ रोजी भोसरी येथील महावितरण कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली. औद्योगिक क्षेत्रातील वीजपुरवठ्याशी संबंधित विविध प्रश्नांवर यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली.
बैठकीस लघुउद्योग संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे, माजी अध्यक्ष सुरेश म्हेत्रे, सचिव जयंत कड, संचालक प्रमोद राणे, नवनाथ वायाळ, सुरेश गवस आणि निस्सार सुतार उपस्थित होते.
महावितरणतर्फे नव्याने नियुक्त झालेले कार्यकारी अभियंता लहाने, आकुर्डी विभागाचे सहाय्यक अभियंता शिर्के, मोशी विभागाचे सहाय्यक अभियंता मोरे, तळवडे विभागाचे उपविभागीय अभियंता सरोदे, अधीक्षक अभियंता सिंहाजी गायकवाड तसेच विभागीय अभियंते झोपे आणि हुलसुळकर उपस्थित होते. यावेळी लघुउद्योग संघटनेच्या वतीने नव्याने नियुक्त अभियंत्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
बैठकीचे संचालन अधीक्षक अभियंता सिंहाजी गायकवाड यांनी केले. त्यांनी मागील महिन्यात फीडरनिहाय वीजपुरवठा खंडित होण्याच्या घटनांचा आढावा घेतला. योग्य नियोजनामुळे वीजपुरवठा खंडित होण्याच्या घटनांमध्ये घट झाल्याचे त्यांनी नमूद केले. मात्र, सध्या तळवडे विभागात वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण तुलनेने अधिक असल्याचे त्यांनी सांगितले.
बैठकीत पिंपरी-चिंचवड औद्योगिक क्षेत्रातील वारंवार होणाऱ्या वीजपुरवठा खंडित होण्याच्या समस्येवर सविस्तर चर्चा झाली. विशेषतः तळवडे येथील देवी इंद्रायणी फीडरवरील वारंवार होणाऱ्या वीजपुरवठा खंडित होण्याच्या तक्रारींची दखल घेत अधीक्षक अभियंता सिंहाजी गायकवाड यांनी उपविभागीय अभियंता सरोदे यांना आवश्यक त्या उपाययोजना तातडीने राबविण्याच्या सूचना दिल्या.
औद्योगिक क्षेत्राला अखंडित व दर्जेदार वीजपुरवठा मिळावा, यासाठी महावितरण आणि लघुउद्योग संघटना यांच्यात समन्वय ठेवून पुढील काळातही अशाच नियमित बैठका घेण्यावर बैठकीत भर देण्यात आला.
















