- मनोज सेठिया यांच्या नावास पदोन्नतीची शिफारस…
- अंतिम मंजुरीसाठी महापालिका सभेकडे प्रस्ताव जाणार…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि.०२ जुलै २०२६) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विधी समितीच्या शुक्रवारी (३ जुलै) होणाऱ्या बैठकीत सध्या चर्चेत असलेला ‘शहर अभियंता’ पदोन्नतीचा विषय विचारार्थ येणार आहे. महापालिकेतील रिक्त असलेले ‘शहर अभियंता’ (एस-२७ वेतनश्रेणी) पद पदोन्नतीने भरण्याचा प्रस्ताव समितीसमोर ठेवण्यात आला आहे.
कार्यपत्रिकेनुसार, पदोन्नती समितीने पिंपरी-चिंचवड महापालिका सेवा (सेवा प्रवेश व सेवांचे वर्गीकरण) नियम, २०२० तसेच शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पात्र अधिकाऱ्यांच्या शैक्षणिक पात्रता, सेवाज्येष्ठता, अनुभव, गोपनीय अहवाल आणि इतर निकषांचा विचार करून सहा शहर अभियंता मनोज मोतीलाल सेठिया यांच्या नावाची शिफारस केली आहे.
संबंधित प्रस्तावानुसार, शासनाच्या अंतिम मान्यतेच्या अधीन राहून मनोज सेठिया यांना तात्पुरत्या स्वरूपात ‘शहर अभियंता’ पदावर पदोन्नती देण्याची शिफारस महापालिका सभेकडे पाठविण्याबाबत विधी समितीकडून निर्णय अपेक्षित आहे.
दरम्यान, या पदोन्नतीच्या विषयाची शहरात मोठी चर्चा सुरू असून, त्यासंदर्भात विविध स्तरांवर मतमतांतरे व्यक्त होत आहेत. त्यामुळे उद्याच्या विधी समितीच्या बैठकीत या प्रस्तावावर काय निर्णय होतो, याकडे महापालिका प्रशासन, नगरसेवक आणि कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे.
















