- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुभारंभ; ४३०.७५ कोटींच्या प्रकल्पाला वेग…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ३ जुलै २०२६) :- पिंपरी-चिंचवड शहराच्या पर्यावरणीय विकासासाठी महत्त्वाच्या ठरणाऱ्या ‘नमामी इंद्रायणी’ (इंद्रायणी नदी सुधार) प्रकल्पाचे भूमिपूजन ८ जुलै २०२६ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. पवना थेट जलवाहिनी प्रकल्पासंदर्भात विधानभवनात झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत ही माहिती देण्यात आली. या प्रकल्पाला महापालिकेच्या स्थायी समितीने मंजुरी दिल्याने प्रत्यक्ष कामाचा मार्गही मोकळा झाला आहे.
केंद्र सरकारच्या अमृत २.० योजनेअंतर्गत सुमारे ४३०.७५ कोटी रुपयांचा हा प्रकल्प राबविण्यात येणार असून, इंद्रायणी नदीतील प्रदूषण कमी करणे, जलगुणवत्ता सुधारणे, नदीकाठाचे संवर्धन, जैवविविधतेचे संरक्षण आणि नागरिकांसाठी पर्यावरणपूरक नदीकिनारा विकसित करणे हे त्याचे प्रमुख उद्दिष्ट आहे. या प्रकल्पासाठी यापूर्वी सुमारे ५२६ कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती.
महापालिकेच्या पर्यावरण अभियांत्रिकी विभागामार्फत प्राप्त झालेल्या निविदांपैकी मे. एल.सी. इन्फ्रा प्रा. लि. यांची निविदा मंजूर करण्यात आली आहे. कंपनीने अंदाजित खर्चापेक्षा सुमारे तीन टक्के कमी दराने काम करण्याची तयारी दर्शविल्यामुळे महापालिकेच्या निधीची बचत होणार आहे. प्रकल्पाची मुदत ३६ महिने निश्चित करण्यात आली असून, इंद्रायणी नदीपात्रालगत ६० एमएलडी क्षमतेचे सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारले जाणार आहेत.
आमदार महेश लांडगे यांनी या प्रकल्पासाठी सातत्याने पाठपुरावा केला असून, हा प्रकल्प शहराच्या शाश्वत विकासासाठी महत्त्वाचा टप्पा ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकल्प गुणवत्तापूर्ण, पारदर्शक आणि निर्धारित मुदतीत पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर इंद्रायणी नदीचे नैसर्गिक स्वरूप जपत स्वच्छ, सुरक्षित आणि आकर्षक नदीकिनारा नागरिकांना उपलब्ध होणार आहे.
















