- देहू ते आकुर्डी पालखी मार्गावर १६८ एसपीओ- पोलीस मित्रांची सेवा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ३ जुलै २०२६) :- जगतगुरु संत तुकाराम महाराज यांच्या ३४१ व्या आषाढी पालखी सोहळ्याचे ७ जुलै २०२६ रोजी देहू येथून प्रस्थान होणार असून, ८ जुलै रोजी आकुर्डी येथील विठ्ठल मंदिरात पालखीचा मुक्काम असणार आहे. या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि वाहतूक व्यवस्थापनासाठी १६८ एसपीओ (स्पेशल पोलीस ऑफिसर), पोलीस मित्र आणि स्वयंसेवक सेवेत कार्यरत राहणार आहेत.
या अनुषंगाने निगडी वाहतूक विभागात महत्त्वपूर्ण नियोजन बैठक पार पडली. पोलीस उपनिरीक्षक रवींद्र आहेरराव आणि प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीचे राज्याध्यक्ष डॉ. विजयकुमार पाटील यांनी स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले. यावेळी विभागीय प्रमुख व टीम लीडर विशाल शेवाळे, संतोष चव्हाण, राम सुर्वे, तेजस सकट, गौरी सरोदे, रुपाली भालेराव, शिल्पा हेरलगी, उमेश देशमुख आणि समीर शेख उपस्थित होते.
रवींद्र आहेरराव यांनी सांगितले की, गेल्या २४ वर्षांपासून पालखी सोहळ्यात वारकऱ्यांच्या सेवेसाठी कार्यरत असलेल्या एसपीओ व पोलीस मित्रांचे योगदान पोलीस प्रशासनासाठी मोलाचे आहे. आकुर्डी मुक्कामादरम्यान प्रमुख चौकांमध्ये गर्दी नियंत्रण, वाहतूक नियमन आणि वारकऱ्यांना मार्गदर्शन करण्याची जबाबदारी स्वयंसेवक पार पाडतील.
डॉ. विजयकुमार पाटील यांनी सांगितले की, यंदा पावसाची शक्यता लक्षात घेऊन भाविकांना रेनकोट, औषधे आणि प्राथमिक वैद्यकीय मदत उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच स्वयंसेवक स्थानिक प्रशासन आणि पोलीस बंदोबस्ताला सहकार्य करणार आहेत.
या उपक्रमासाठी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, अतिरिक्त पोलीस आयुक्त सारंग आवाड, पोलीस उपायुक्त श्वेता खेडकर, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रवीण मोरे व प्रिया ढमाळे तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षकांसह वरिष्ठ अधिकारी स्वयंसेवकांना मार्गदर्शन करणार आहेत. महिला स्वयंसेवकांचे स्वतंत्र पथकही पालखी सोहळ्यात सेवा बजावणार आहे.
















