- एक जण गंभीर जखमी, संतप्त नागरिकांकडून वाहनांची तोडफोड…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ३ जुलै २०२६) :- पिंपरी-चिंचवडमधील जाधववाडी परिसरात सुरू असलेल्या एका बांधकाम प्रकल्पात संरक्षणभिंत कोसळून एक नागरिक गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. जखमी व्यक्तीवर रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जाधववाडी येथे संकेश्वर कॅपिटल या बांधकाम प्रकल्पाचे काम सुरू आहे. मात्र, बांधकामादरम्यान आवश्यक सुरक्षा नियमांचे पालन करण्यात आले नसल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. याच निष्काळजीपणामुळे संरक्षणभिंत कोसळून एक नागरिक तिच्या खाली दबला गेला.
या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला. बांधकामामुळे शेजारील रहिवाशांच्या जीवितासही धोका निर्माण झाल्याचा आरोप करत संतप्त नागरिकांनी बांधकाम व्यावसायिकाच्या काही वाहनांची तोडफोड केली.
घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि संबंधित यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या. परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. सुरक्षा नियमांचे उल्लंघन झाले का, तसेच या प्रकरणात संबंधित बांधकाम व्यावसायिकावर काय कारवाई होणार, याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
















