- १५६ एनडीपीएस गुन्ह्यांतील गांजा, एमडी, ब्राऊन शुगरसह विविध अंमली पदार्थांची भट्टीत विल्हेवाट…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ३ जुलै २०२६) :- पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाने अंमली पदार्थांविरोधातील कारवाईचा भाग म्हणून १५६ एनडीपीएस गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आलेले तब्बल २ कोटी ६४ लाख १३ हजार ७१० रुपये किमतीचे अंमली पदार्थ नष्ट केले. ही कारवाई ३० जून २०२६ रोजी रांजणगाव एमआयडीसी येथील महाराष्ट्र एन्व्हायरो पॉवर लिमिटेडच्या प्रकल्पात करण्यात आली.
पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या आदेशानुसार तसेच केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार गठित समितीच्या देखरेखीखाली ही प्रक्रिया पार पडली. यावेळी प्रादेशिक न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा, राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या प्रतिनिधींची उपस्थिती होती.
या कारवाईत ३१५ किलो गांजा, ७६१ ग्रॅम एमडी, १२ किलो अफूची झाडे, ३०० ग्रॅम ब्राऊन शुगर आणि १०९ किलो डुडा अशा विविध अंमली पदार्थांचा भट्टीत जाळून नाश करण्यात आला.
या समितीचे अध्यक्ष अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड असून, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) रोहिदास पवार आणि पोलीस उपआयुक्त (परिमंडळ-१) संदीप आटोळे हे सदस्य आहेत.
ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सहपोलीस आयुक्त शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड, पोलीस उपआयुक्त रोहिदास पवार, पोलीस उपआयुक्त संदीप आटोळे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त प्रवीण मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथकाने यशस्वीपणे पार पाडली.
















