- थकबाकीदारांवर करण्यात येणार जप्ती
ची कारवाई…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ३ जुलै २०२६) :- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने चालू आर्थिक वर्ष २०२६-२७ चा मालमत्ता कर ऑनलाइन पद्धतीने भरणाऱ्या मालमत्ताधारकांसाठी विशेष सवलत जाहीर केली आहे. १ जुलै ते ३० सप्टेंबर २०२६ या कालावधीत ऑनलाइन मालमत्ता कर भरल्यास सामान्य करावर ४ टक्के सवलत दिली जाणार आहे. अद्याप कराचा भरणा न केलेल्या मालमत्ताधारकांनी त्वरित ऑनलाइन कर भरून या सवलतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाने केले आहे.
मालमत्ताधारकांना कर भरणा, उपलब्ध सवलत योजना, अंतिम मुदत तसेच थकबाकीची माहिती एसएमएसद्वारे नियमितपणे पाठविण्यात येत आहे. तसेच टेली-कॉलिंगद्वारे थेट संपर्क साधून कर भरण्याबाबत मार्गदर्शन केले जात असून, ऑनलाइन व प्रत्यक्ष कर भरण्याच्या सुविधांची माहितीही दिली जात आहे. करदात्यांच्या शंका आणि अडचणींचे निराकरण संबंधित विभागामार्फत करण्यात येत आहे.
महापालिकेने डेटा-आधारित संवाद प्रणालीचा अवलंब केल्यामुळे प्रत्येक मालमत्ताधारकापर्यंत आवश्यक माहिती प्रभावीपणे पोहोचत असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे. जनजागृती आणि थेट संवादामुळे कर भरण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद मिळत असला, तरी अद्यापही अनेक मालमत्ताधारकांकडे थकबाकी आहे.
दरम्यान, कर आकारणी व कर संकलन विभागाने थकबाकीदारांविरुद्ध जप्तीची कारवाई सुरू केली आहे. शहरातील १८ विभागीय कार्यालयांमार्फत ३५ हजारांहून अधिक मालमत्ताधारकांना जप्तीपूर्व नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. नोटीस मिळूनही पहिल्या तिमाहीत कर न भरणाऱ्या मालमत्तांवर आता थेट जप्तीची कारवाई करण्यात येत आहे. विशेषतः बिगर निवासी, औद्योगिक आणि मिश्र वापराच्या मालमत्ताधारकांवर ही कारवाई अधिक प्रभावीपणे राबविण्यात येत असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे.
















