न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ०४ जुलै २०२६) :- पिंपरी-चिंचवड परिसरात मोबाईल चोरीच्या संशयातून आणि किरकोळ वादातून दोन वेगवेगळ्या ठिकाणी खून झाल्याच्या घटना घडल्या असून, दोन्ही प्रकरणांतील आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.
दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोई गावातील गुरुकृपा हौसिंग सोसायटीत २९ जून रोजी आरोपीने मोबाईल चोरीचा संशय घेऊन चाँद याकुब शेख (वय ४२) यांना बेदम मारहाण केली. चेहऱ्यावर गंभीर मारहाण झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.
दुसरी घटना आळंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चऱ्होली खुर्द येथील घोलप वस्तीमध्ये २ जुलै रोजी घडली. किरकोळ भांडणाचा राग मनात धरून साहील रामदास दाभाडे (वय २९) याने करवीरसिंग नथुसिंग लोधी यांच्या डोक्यात हातोडीने वार करून त्यांचा खून केला. या प्रकरणी चंद्रकांत पंढरीनाथ भाळे यांनी फिर्याद दिली असून आळंदी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
दोन्ही घटनांचा पुढील तपास संबंधित पोलीस ठाण्यांकडून सुरू आहे.















