- खासदार श्रीरंग बारणे यांचा पुढाकार; शेतकऱ्यांच्या मागण्या मार्गी लावण्याची प्रशासनाची ग्वाही…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. १३ जुलै २०२६) :- पवना बंदिस्त जलवाहिनी योजनेबाबत आंदोलक शेतकरी आणि प्रशासनाची जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी समन्वय बैठक झाली. मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या पुढाकारातून झालेल्या बैठकीत शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाली.
जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, आमदार सुनील शेळके, माजी मंत्री बाळा भेगडे, महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, पीएमआरडीए आयुक्त अभिजीत चौधरी यांच्यासह अधिकारी व धरणग्रस्त शेतकरी उपस्थित होते.
धरणासाठी संपादित जमिनींचा मोबदला व पर्यायी जमीन, मावळसाठी पाणी आरक्षण, गावांना शुद्ध पाणी, धरणग्रस्तांना महापालिका नोकरीत पाच टक्के कोटा आणि पवना नदी स्वच्छ ठेवण्याच्या मागण्या शेतकऱ्यांनी मांडल्या. मागण्या सोडविण्यास प्रशासन सकारात्मक असल्याची ग्वाही जिल्हाधिकारी डुडी यांनी दिली. शेतकऱ्यांवर अन्याय न होता योजना मार्गी लावण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे खासदार बारणे यांनी सांगितले.
















