- विषारी दारू प्रकरणातील पीडितांना मदत; मोशी दुर्घटनेमुळे पत्रकार परिषद रद्द…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. १३ जुलै २०२६) :- महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात आमदार अमित गोरखे यांनी पिंपरी-चिंचवडसह राज्यातील जनहिताचे १४ महत्त्वाचे मुद्दे विधान परिषदेत उपस्थित केले. दापोडी-फुगेवाडी विषारी दारू प्रकरणातील २२ मृतांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत मंजूर करण्यात त्यांच्या पाठपुराव्याला यश मिळाले.
तसेच या प्रकरणातील मुख्य आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई, तपास सीआयडीकडे वर्ग करणे आणि मिथेनॉल पुरवठा साखळीविरोधात विशेष पथके नियुक्त करण्याची घोषणाही करण्यात आली.
अधिवेशनात त्यांनी एमआयडीसी पुनर्विकास, पाणी सुरक्षा, गेमिंग झोन सुरक्षा, मागासवर्गीयांवरील अत्याचार, महिला शेतकरी सक्षमीकरण, पर्यावरण, वृक्षतोड आणि मराठीतून अभियांत्रिकी शिक्षण आदी विषय मांडले. दरम्यान, मोशी कचरा डेपो दुर्घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन यावेळी परंपरेप्रमाणे पत्रकार परिषद न घेण्याचा निर्णय घेत त्यांनी पीडितांप्रती संवेदनशीलता व्यक्त केली.
















